Post by Sheetal Arjunwadkar
Entrepreneur | Strategist | Industry Leader | Ecosystem Mentor | Philanthropist | Driving Conscious, Sustainable Impact (SasyaSetuu)
Rhythm of Reflection ✨ “नात्यांमध्ये जपायचं काय—शब्द की माणसं ”? हा प्रश्न मला एका साध्या संवादातून मिळाला. काही संवाद असे असतात, जे क्षणभरासाठी ऐकले जातात… पण मनात कायमचे घर करून बसतात. अलीकडेच चिरागशी (माझ्या जावयाशी) Chirag Harinkhede बोलताना त्याने एक साधा पण खूप खोल अर्थ असलेला विचार मांडला, "जर एखाद्याने काय बोललं ते महत्त्वाचं वाटत असेल, तर त्या व्यक्तीला विसरून जा… आणि जर ती व्यक्ती महत्त्वाची असेल, तर तिचं बोलणं विसरून जा." क्षणभर मी स्तब्ध झाले… कारण त्या एका वाक्यात अनेक अनुभव दडलेले होते. आपल्या आयुष्यात असे प्रसंग वारंवार घडत असतात.. कधी घरात एखादं साधं वाक्य नकळत मनाला लागून जातं… कधी कामाच्या ठिकाणी कोणी काही बोलून जातं आणि आपण दिवसभर तेच मनात पुन्हा पुन्हा जगत राहतो… कधी जवळच्या व्यक्तीने रागाच्या भरात बोललेलं एखादं वाक्य आपण वर्षानुवर्षं मनात साठवून ठेवतो… आणि मग हळूहळू… शब्द साठत जातात, गैरसमज वाढतात, आणि नकळत नात्यांमध्ये अंतर निर्माण होतं. पण खरंच… काय अधिक महत्त्वाचं आहे? क्षणिक बोललेले शब्द… की त्या नात्यामागची माणसं? विचार करता करता जाणवलं, शब्द कधी कधी परिस्थितीचे असतात, भावनेच्या भरात आलेले असतात… पण माणसं मात्र आपल्या आयुष्याचा कायमचा भाग असतात. जर आपण प्रत्येक शब्दाला घट्ट धरून बसलो, तर नात्यांमध्ये दुरावा वाढतो. पण जर आपण माणसांना समजून घेण्याचा प्रयत्न केला… तर शब्द आपोआप हलके होतात. हे सगळं अमलात आणणं सोपं नाही… भावनांच्या क्षणी थांबणं, विचार करणं आणि मग निवड करणं, ही एक जाणीवपूर्वक प्रक्रिया आहे. पण कदाचित आपण एवढं तरी करू शकतो, क्षणभर थांबू, स्वतःला विचारू… आणि मग प्रतिक्रिया देऊ. कदाचित तिथूनच आयुष्य थोडं अधिक साधं, हलकं आणि सुंदर होऊ शकतं. कदाचित परिपक्वतेचा खरा अर्थ हाच असेल... कधी शब्द सोडून द्यायचे… आणि कधी माणसं जपायची. आज मी स्वतःला शांतपणे विचारते.. मी शब्दांना धरून ठेवते आहे का… की माणसांना? ✨ जाणीवपूर्वक जगा.. शीतल अर्जुनवाडकर #RhythmOfReflection #SelfReflection #RelationshipsMatter #InnerGrowth #MindfulLiving #SheetalArjunwadkar ✨