Post by Maharashtra News Network
News Editor at Maharashtra News Network
प्राचार्यांकडून खंडणी उकळणारे तिघे पोलीस निलंबित पीएसआय अजित बडे, रीलस्टार सोनाली हिंगे, सुदाम तायडे यांचा समावेश पुणे : अल्पवयीन विद्यार्थिनीला हाताशी धरून प्राचार्यांना पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून बदनामी करण्याची भीती दाखवून ७ लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक, रीलस्टार आणि पोलीस अंमलदारांसह तिघांना निलंबित करण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक अजित त्र्यंबक बडे (वय ३५, रा. त्रिमूर्ती अपार्टमेंट, लक्ष्मीनगर, पर्वती), पोलीस अंमलदार सुदाम बाळकृष्ण तायडे (वय ३५, रा. स्वप्नपूर्ती अपार्टमेंट, हिंजवडी) आणि रीलस्टार सोनाली गुलाबराव हिंगे (वय ३५, रा. जे. जे. नगर, केसनंद फाटा, वाघोली) अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत. मंगळवार पेठेतील एका महाविद्यालयात १८ ते २८ जुलै २०२५ दरम्यान हा प्रकार घडला होता. या महाविद्यालयातील अल्पवयीन मुलीला हाताशी धरून या पोलिसांनी तिला फिर्यादी बनवून प्राचार्यांच्या विरोधात भीती दाखवून, फसवणूक करून खोटी तक्रार देण्यास भाग पाडले. प्राचार्यांवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होईल, अटक केली जाईल, तसेच तुमची व महाविद्यालयाची बदनामी होईल, अशी भीती दाखवण्यात आली. त्यानंतर त्यांच्याकडून ७ लाख रुपयांची खंडणी उकळण्यात आली. या मुलीने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर बंडगार्डन पोलीस ठाण्यात संबंधितांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याची खबर लागताच ते फरार झाले आहेत. कर्तव्यात बेजबाबदारपणा व निष्काळजीपणे गैरवर्तन केल्यामुळे पोलिसांची प्रतिमा मलिन केल्याने अपर पोलीस आयुक्त संजय पाटील यांनी तिघांना निलंबित केले आहे. #MaharashtraNewsNetwork #breakingnews #newsupdates #headlines #viralnews #localnews #Politicalnews #crimenews #governmentnews #dailynews #socialnews