Post by Maharashtra News Network
News Editor at Maharashtra News Network
मद्यपी चालकाला १५ दिवस कारावासाची शिक्षा पुणे : मद्यपी चालक अपघाताला कारणीभूत होतात, हे लक्षात घेऊन शहर पोलीस दलाकडून नेहमीच ‘ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह’ विशेष मोहीम राबवून अशा वाहनचालकांवर कारवाई केली जाते. अशाच एका मद्यपी वाहनचालकाला शिवाजीनगर न्यायालयाने १५ दिवस साधा कारावास व १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. ही घटना आळंदी येथील मरकळ रोडवरील ज्ञानेश्वर मिसळ येथे ३० ऑगस्ट २०२५ रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली होती. महिला पोलीस अंमलदार मिलखे यांनी ३१ वर्षांचा तरुण दारू पिऊन वाहन चालवत असल्याचे आढळून आले होते. त्याच्यावर दिघी-आळंदी वाहतूक विभागाने मोटार वाहन कायदा कलम १८५, १८४ प्रमाणे कारवाई करून शिवाजीनगर येथील मोटार वाहन न्यायालयात खटला पाठविण्यात आला होता. मोटार वाहन न्यायालयाचे न्यायदंडाधिकारी पाटील यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. आरोपी वाहनचालकाचा मोटार वाहन कायदा कलम २०३ (६) अन्वये त्याचा वैद्यकीय चाचणी नमुना पुरावा म्हणून ग्राह्य धरून त्याला दोषी ठरविण्यात आले. त्याला मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे १५ दिवस साधा कारावास आणि मोटार वाहन कायदा कलम १८५ प्रमाणे १५ दिवस साधा कारावास व १० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १० दिवस साधा कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. या दोन्ही कारावासाच्या शिक्षा एकत्रित भोगावयाच्या आहेत. #MaharashtraNewsNetwork #breakingnews #newsupdates #headlines #viralnews #localnews #Politicalnews #crimenews #governmentnews #dailynews #socialnews